सोयगाव तालुक्यातील घोसला येथील पिंटू गव्हांडे या शेतकऱ्याने आपल्या शेतात सिंचनवर लागवड केलेली पाच एकर क्षेत्रातील कपाशी वाढ खुंटल्याने आणि लाल पडून मर होत असल्याने उपटून फेकली आहे.
सोयगाव तालुक्यात कपाशी वाढ आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. औषध खताचा आणि पाण्याचा खर्च करून शेतकऱ्यांच्या हाती काहीच न आल्याने शेतकरी हवालदिन झाले आहेत.
advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकऱ्याने कपाशीचं पीक उपटून टाकलं आहे. शेतकरी शैलेंद्र बिल्लारे या शेतकऱ्याने आपल्या साडेचार एकर शेतात लावलेल्या कपाशीमध्ये ट्रॅक्टर घालून कपाशीचं पीक नष्ट केलं. खामगाव, नांदुरा, जळगाव जामोदसह इतर तालुक्यात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची वाढ थांबली.
कपाशीवर लाखो रुपये खर्च करून काहीही हाती लागणार नसल्याने शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांनी कपाशी उपटून टाकली तर काहींनी ट्रॅक्टर किंवा जनावरे घातली आहेत.
खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकरी शैलेंद्र बिलारे यांनी सुद्धा साडेचार एकर मध्ये कपाशी लावली होती. लाखो रुपये त्यावर खर्च केला, कपाशी जोमात असताना त्यावर लाल्या रोग झाला आणि हातातोंडाशी आलेला घास गेला. कपाशीवर ट्रॅक्टर फिरवावा लागला, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
