मृत्यू समोर असतानाही पोलिसांनी तस्करांना रोखले
या जीवघेण्या पाठलागात गुन्हे शाखेचे अंमलदार दादासाहेब झारगड यांनी धाडसाची कमाल करत धावत्या कारच्या बोनेटवर उडी मारली आणि काच फोडली. काच फुटताच चालकाचे नियंत्रण ढळले, समोरचे दिसेनासे झाले आणि गाडीचा वेग मंदावला. याच क्षणी पोलिसांच्या वाहनांनी चारही बाजूंनी घेराव घालत कार थांबवली आणि 18.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली.
advertisement
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख समीर राजसाब (वय 24, लातूर), सय्यद अल्ताफ वहाब (वय 23, उदगीर, लातूर) आणि उमर अब्दुल सहाब (वय 36, लातूर) यांचा समावेश आहे.पदमपुऱ्यातील हनुमान मंदिराच्या तपासकामी शनिवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरात वाहन तपासणीचे आदेश दिले होते.रात्री 9:20 वाजण्याच्या सुमारास केंब्रिज चौकात पीएसआय प्रवीण वाघ यांच्या पथकाला तवेरा (एमएच-12 एचएन-9917) संशयास्पद दिसली. पोलिसांनी इशारा करूनही चालकाने गाडी थांबवली नाही. त्यानंतर ही कार ताशी 100 किमीपेक्षा अधिक वेगाने सावंगी बायपास, नारेगाव, बजरंग चौक मार्गे टीव्ही सेंटरकडे सुसाट निघाली.
गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी आयपी मेसजवळील चौकात गाडी आडवी लावत मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र, तस्करांनी वेग कमी केला नाही. पुढे गणेश कॉलनी परिसरात अंमलदार गणेश सागरे यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने थेट धडक दिली. या धडकेत सागरे जखमी झाले.
'टॉपर' निघाला नशेचा तस्कर
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे अटकेतील शेख समीर रजवार हा लातूरच्या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. 12 वीमध्ये त्याला 89 टक्के गुण मिळाले होते. मात्र, झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी हा गुणवंत तरुण अमली पदार्थांच्या तस्करीकडे वळला.
लातूरच्या मराठवाडा मेडिकलमधून केवळ 40 रुपयांच्या कमिशनसाठी सिरपची प्रत्येक बाटली आणली जात होती. बाजारात 80 रुपयांची बाटली तब्बल 400 रुपयांना विकण्याचे या टोळीचे नियोजन होते.
कार सुसाट धावत असतानाच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतले. आरोपींचे लोकेशन आणि ते ज्या दिशेने जात आहेत ही माहिती रिअल टाइममध्ये शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात येत होती.यामुळे काही मिनिटांतच शहरातील विविध चौकांमध्ये नाकेबंदी उभी राहिली आणि तस्करांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात यश आले.
