छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. दिवसाढवळ्या सर्रास गावठी कट्टे घेऊन गुंड, टवाळखोर मवाली, बिनधास्त फिरत आहेत. चालता बोलता गोळ्या झाडत आहेत, चाकू घेऊनही काहीजण फिरत आहेत. दररोज वाढणाऱ्या चोऱ्या, हाणामाऱ्या, गोळीबार चिंतेचा विषय झालाय. असेच चालू राहिले तर संभाजीनगरचे बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी चर्चा आता सर्वसामान्य करू लागला आहे.
advertisement
पर्यटन राजधानी आता क्राइम कॅपिटल?
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या, गुटखा विक्री, गांजा विक्री आणि इतर नशा करणारे पदार्थ सर्रास विकले जातात. तर या सोबतच अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यास पोलिसांचे अभय असून लाखोंची हप्ता वसुली होते. सर्रास गावठी कट्टे विकले जात आहेत. यातूनच गोळीबार आणि हाणामारी यासारख्या घटना समोर येत आहेत. शहराची अवस्था सध्या बिहार सारखी झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी चार महिन्यापूर्वी पोलीस दलात हप्तेखोरी सुरू असल्याचा आरोप केल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. शहरातल्या गुन्हेगारीच्या प्रमाणात 70 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सभागृहात सांगितल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. वाळूच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकावर नाव घेऊन हप्ते वसुली करण्याचा आरोप दानवे यांनी केला होता तर त्यानंतर त्याच पोलीस निरीक्षकाला थेट गुन्हे शाखेत बसवण्यात आले असून दुप्पट हप्ते वसुली सूरु असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला. तर त्यासंबंधी डॉक्युमेंट्स देखील विधान परिषदेत सादर केले होते.
मागील दोन आठवड्यामध्ये शहरात दोन गोळीबार करण्यात आले, यामध्ये भरदिवसा घरात घुसून महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच पैशाच्या वादातून एका तरुणाने गोळीबार करत एकाला ठार केले तर एक गंभीर जखमी झाला होता. या घटनेला काही तास उलटले होते तोच वाळूज परिसरामध्ये एका ज्वेलर्स शॉपमध्ये बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून भर दिवसा दरोडा टाकण्यात आला. तर काल रात्री सिडको बस स्थानकात पोलीस चौकीच्या बाजूलाच असलेल्या वाहन तळाच्या कार्यालयात टवाळखोर गुंडांनी कार्यालयातील मुलाला पैशाची मागणी करून मारहाण केली तर कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली. शहराची आणि बिहारची तुलना होऊ शकत नाही. कारण बिहारमध्ये दारूबंदी आहे इथे तर खुले आम दारू विक्री सुरू आहे. दारुड्यांचा, नशेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्याचा व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास होत असून, यापासून संरक्षण मिळावे यासाठी काल व्यापाऱ्यांनी आंदोलन देखील केले. याच घटना नाही तर अशा अनेक घटना शहरात सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाचा - दिरासोबत 4 वर्षापासून वहिनीचे प्रेमसंबंध; अचानक तिसऱ्याची एन्ट्री अन् घडलं भयानक
कोणत्याही शहराची प्रगती तेव्हाच होते, ज्यावेळेस शहर पूर्णपणे सुरक्षित असते, त्यामुळे गुन्हेगारी वाढण्यासाठी फक्त पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. टवाळखोर आणि गुंडांना पकडल्यावर पोलिसांना पहिला फोन राजकारण्यांचा जातो, परवाण्याविना पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या मुलाला सोडवण्यासाठी राजकारणी फोन करतात, तोच मुलगा पुढे पिस्तलातून गोळीबार करू लागतो. हे सत्य नाकारता येणार नाही त्यामुळे राजकीय नेत्यांनी आणि पोलिसांनी मिळून संकल्प केला तर हे चित्र बदलू शकते.
