तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असूनही, 'कमी वेळात जास्त पैसा' कमावण्याच्या प्रलोभनाने एका सुशिक्षित तरुणाने आयुष्यभराची पुंजी संकटात टाकली आहे. ही घटना 5 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान घडली आहे. या प्रकरणात मोहन शर्मा सह अन्य मोबाईल धारक अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे समोर आली असून या आरोपींविरोधात जवाहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
जाळ्यात नेमके कसे ओढले अन् घडलं काय..?
या फसवणुकीची सुरुवात एका साध्या व्हॉट्सअॅप लिंकपासून झाली. मोहन शर्मा नावाच्या संशयित आरोपीने फिर्यादी पवन देशमुख (28, रा. उत्तमनगर, जवाहर कॉलनी) यांना एका ग्रुपमध्ये सामील करून घेतले, जिथे शेअर मार्केटच्या 'ट्रेडिंग'चे मोफत धडे दिले जात होते. आरोपींनी पीडिताचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला एका बनावट ॲपवर गुंतवणुकीचा आग्रह धरला. किमान 50 हजार रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास, आयपीओच्या (IPO) नावाखाली लाखो रुपयांच्या गुंतवणुकीपर्यंत पोहोचला आणि तब्बल 43 लाख 77 हजार रुपयांपर्यंत पवन देशमुख यांची फसवणूक झाली.
विविध बँकांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले
फसवणुकीसाठी गुन्हेगारांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीचा वापर केला. 'अवाना इलेक्ट्रोसिस्टम्स लिमिटेड' सारख्या कंपनीच्या आयपीओमध्ये 50 टक्के खात्रीशीर परतावा मिळेल, असे भासवून पीडिताकडून विविध बँकांमधील (येस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, एयू स्मॉल फायनान्स बँक) अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करून घेतले. यामध्ये 'सिकंदर इंटरप्राईजेस' आणि 'जे.एन. ट्रेडिंग' सारख्या संस्थांच्या नावावर असलेल्या खात्यांचा वापर करून पैशांची मागणी करण्यात आली.
बनावट नफा आणि सत्य परिस्थिती वेगळीच
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 21 जानेवारीपर्यंत फिर्यादीच्या ॲपवर 78 लाखांहून अधिक रुपयांचा आभासी नफा दिसत होता. मात्र, जेव्हा हा पैसा प्रत्यक्ष खात्यात काढण्याची वेळ आली तेव्हा आरोपींनी 65 लाखांची अतिरिक्त मागणी केली. ही रक्कम भरल्याशिवाय मूळ नफा मिळणार नाही, असे सांगताच पवन यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. सध्या जवाहरनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन कुंभार करीत आहे.
