या मारहाणीनंतर भैय्या गायकवाडने मारेकऱ्यांना उघड धमकी दिली आहे. त्याने एक रिल टाकून ही धमकी दिली आहे. या रिलमध्ये भैय्या गायकवाडने आर्वाच्च भाषेचा वापर केला आहे. तसेच आपण मारहाणीचा बदला घेणार आहे, असंही त्याने व्हिडीओत म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी अद्याप कुणीच कुणाविरोधात गुन्हा दाखल केला नाही.
advertisement
नेमकी धमकी काय दिली?
किंगमेकर ग्रुप फेम भैय्या गायकवाड रिलमध्ये म्हणाले, "अरे जळू नका बरोबरी करा. परवा मी सिल्लोडला गेलो होतो. तिकडे सरपंच मंगेशदादा साबळे उपोषणाला बसले होते, त्यांना भेटायला गेलो होतो. तिकडून परत येताना, तुम्ही माझा पाठलाग केला. समृद्धी हायवेने जाताना तुम्ही मला टोलनाक्यावर मारलं. तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे, तुम्ही जळू नका बरोबरी करा. आणि काय रे तुम्हाला जिपची आणि थारची काय लेव्हल माहीत आहे का? सांगणं एवढंच आहे, तुम्ही आम्हाला जेवढं मारलंय ना, याचा बदला नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त इकडे या. मित्रानो मला थोडंच लागलंय. काही झालं नाही. ही फक्त जाहिरात होती, पिक्चर अजून बाकी आहे," अशी धमकी भैय्या गायकवाडने दिली.
भैय्या गायकवाडला मारहाण का झाली?
त्याचं झालं असं की, रिल स्टार भैय्या गायकवाड उर्फ गोरख गायकवाड हा आपल्या एका मित्रासोबत कारने छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवास करत होता. कार संभाजीनगरच्या सावंगी समृद्धी टोलनाकावर पोहोचली. कारवर फास्ट टॅग नव्हता. त्यामुळे टोलसाठी शिल्लक पैसे द्यावे लागणार होते. यावरून भैय्या गायकवाड गाडीतून खाली उतरला. टोल कर्मचाऱ्यांशी आपल्या स्टाईलमध्ये बोलण्यास सुरुवात केली. बघता बघता टोल कर्मचारी आणि भैय्या गायकवाडमध्ये बाचाबाची झाली. व्हिडीओमध्ये दिसतंय की, टोल कर्मचाऱ्यांचा पगार किती आहे, यावरून त्यांना डिवचण्यात आलं.
एकतर आधीच कारवर फास्ट टॅग नाही, टोलचे पैसे द्यायलाही टाळाटाळ करायला आणि उलट आपल्यालाच दमबाजी करत असल्यामुळे टोल कर्मचारी कमालीचे संतापले. त्यामुळे ६ जणांनी मिळून भैय्या गायकवाडला चांगलाच चोप दिला. बेदम मारहाण करत असताना टोल कर्मचाऱ्यांनी भैय्या गायकवाडचा व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड केला. एका व्हिडीओमध्ये दिसतंय की, भैय्या गायकवाडला या टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करत आहे, पण, त्याने व्हिडीओ तरी डिलीट करा, अशी विनवणी करत होता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अद्याप पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. भैय्या गायकवाडनेही पोलीस स्टेशन अजून गाठलं नाही. पण, भैय्या गायकवाडला मारहाणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.