ही घटना सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे घडली. आरोपी शिक्षकाने लग्नाचं अमिष दाखवून आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयातील १२वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलं आहे. याप्रकरणी ४० वर्षीय शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुशिष्य नात्याला काळीमा फासला असून या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनी अजिंठा येथील एका महाविद्यालयात १२वीच्या वर्गात शिकत होती. या विद्यार्थिनीला याच कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्त देवेंद्र किशोर तायडे या शिक्षकाने विविध आमिषे दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सदरील विद्यार्थिनी टीईटी फॉर्म भरायला सिल्लोडला जात आहे, असे सांगून घरातून निघून गेली, ती परतली नाही.
advertisement
त्यामुळे या मुलीच्या नातेवाइकांनी अधिक चौकशी केली असता याच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक देवेंद्र किशोर तायडे याने, तुझे शिक्षण पूर्ण करेन, लग्नही करेन, असे आमिष दाखवून एका कारमधून तिला पळवून नेल्याचे समजले. या प्रकरणी अजिंठा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षक आरोपी देवेंद्र किशोर तायडे हा फरार झाला आहे. पोलीस दोघांचा तपास करत आहेत.