सागर दिलीप बेलकर असं गुन्हा दाखल झालेल्या २५ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो संभाजीनगरच्या पडेगाव येथील रहिवासी आहे. त्याची प्रेयसी अनुसूचित जातीची असल्याने त्याने गर्भवती प्रेयसीला लग्नास नकार देऊन प्रियकराने तिलाच आत्महत्येची धमकी दिली. पीडितेने मुलीला जन्म देऊन आता पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून सागर दिलीप बेलकरवर छावणी पोलिस ठाण्यात बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडितेची २ वर्षांपूर्वी आरोपी सागरसोबत ओळख झाली होती. दोघांमध्ये मैत्री वाढल्यानंतर याचं रूपांतर प्रेमात झाले. सागरने तरुणीला लग्नाचे स्वप्न दाखवून तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तरुणीने सातत्याने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, त्याने मी माझ्या कुटुंबाला या प्रकरणाबाबत काहीच सांगू शकत नाही. मी आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. यामुळे तरुणी तणावाखाली गेली होती.
दरम्यान, रविवारी तिची प्रकृती खराब झाल्यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले. सकाळी तिने मुलीला जन्म दिला. तरीही सागरने तिला संपर्क केला नाही. यानंतर तरुणीने छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून त्यांनी तत्काळ सागरवर गुन्हा दाखल करत अटक केली. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.