छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागातून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवृत्त विभाग प्रमुखाचा (HOD) आर्थिक वादातून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्याने तपास करत मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली असून, तब्बल 40 दिवसांनंतर मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आहे.
ज्योतीनगर येथील अभिरिका अपार्टमेंटमध्ये राहणारे राजाभाऊ सुभराव लोंढे (वय 60 ) हे 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बेपत्ता झाले होते. त्यांचे भाऊ उत्तम लोंढे यांनी 6 फेब्रुवारी रोजी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास केला असता, राजाभाऊ लोंढे हे शेवटचे त्यांचे मित्र विशाल राठोड, आकाश पवार आणि दोन महिलांसोबत दौलताबाद येथील एका फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले होते, असे समोर आले.
advertisement
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
आरोपी विशाल राठोड याने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, पार्टी संपल्यानंतर 6 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता त्याने लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडले होते. मात्र, महिना उलटूनही लोंढे यांचा पत्ता न लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांची भेट घेतली. आयुक्तांनी या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेकडे सोपवला.
पोलिसांनी आरोपींना खाक्या दाखवल्या
आरोपींनी मृत लोढें यांच्या मोबाइलवर तोडक्या-मोडक्या इंग्रजीत 'im in prrsonal work - 20, 25 dont disturb' असं स्टेटस ठेवलं. मात्र, प्राध्यापक असलेली व्यक्ती चुकीचे इंग्लिश लिहू शकत नाही, हे पोलिसांनी माहितं होतं, त्यानंतर पोलिसांचा संशय अधिकच बळावला अन् पोलिसांनी आरोपींना खाक्या दाखवल्या
असा झाला खुनाचा खुलासा
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजची तपासणी केली असता, आरोपींच्या जबाबात मोठी तफावत आढळली. पोलिसांनी विशाल राठोडला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विशाल आणि राजाभाऊ लोंढे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते.
गोळ्या झाडून हत्या
5 फेब्रुवारीच्या रात्री पार्टीमध्ये लोंढे यांना भरपूर दारू पाजल्यानंतर, शहराकडे परत येत असताना साजापूर शिवारातील रेल्वे पुलाजवळ विशालने पिस्तूलने त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली.
पुराव्यांची विल्हेवाट
खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह गेवराई तांड्याजवळील जंगलात नेला. तिथे आधीच खोदलेल्या एका खड्ड्यात मृतदेह टाकून जेसीबीच्या साहाय्याने त्यावर माती टाकून पुरावा नष्ट केला. विशाल विकास राठोड (वय 24, रा. गेवराई तांडा), आकाश विनोद पवार (वय 32, रा. गेवराई तांडा) , करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा) अशी आरोपींची नावे आहेत.
पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. आरोपींना सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि इतर पुराव्यांचा तपास पोलीस करत आहेत.
