लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नुतनीकरण शुभारंभावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन १० रुपये आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या निर्णयाला काही कारखानदारांनी जोरदार विरोध केला. याचाच धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारखानदारांना इशारा दिला.
advertisement
५ रुपये देताना जीवावर आले, आता मी कारखाने शोधलेत, बघतोच त्यांच्याकडे
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक कारखान्यांच्या अनेक अडचणी होत्या. केंद्र आणि राज्य सरकारने अडचणीच्या काळात त्यांना मदत केली. पण आज शेतकऱ्यांवर संकट आलेले असताना स्वत:च्या नफ्यातील ५ रुपये देखील त्यांना सोडू वाटत नाहीत. काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत. केवळ ५ रुपये शेतकऱ्यांसाठी बाजूला काढा, असे सांगितले होते. फार तर २५ लाख एका कारखान्याला द्यावे लागले असते. मात्र असा गजहब निर्माण केला गेला की शेतकऱ्यांकडूनच पैसे काढून घेतले जात आहेत. मी आता काही कारखाने शोधून काढले आहेत जिथे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनावेळी काटा मारला जातो. त्या कारखान्यांना मी आता पाहतोच... असा इशारा फडणवीस यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या मदतीवरून होणाऱ्या टीकेला फडणवीस यांच्याडून प्रत्युत्तर
कारखान्याचे मालक शेतकरी आहे, त्यांच्या मागे उभे राहण्याचे काम सरकार करेल. काही लोक आपत्तीतही राजकारण करत आहेत. सरकार शेतकऱ्यामागे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आराखडा तयार करतोय. भरीव मदतीसाठी केंद्र मदत करेल. तुम्ही काय केलं हे आरश्यात बघा, जनतेने आम्हाला सेवेसाठी पाठवले आहे आम्ही सेवा करू, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.