गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीत जिल्हा निवड मंडळाची बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीची सूचना जिल्हा निरीक्षकांना देण्यात आली नव्हती. जिल्हा निरीक्षक आणि प्रदेशला सूचना न देता बैठक घेतल्याने याची दखल हर्षवर्धन सपकाळ यांनी घेत बैठक पुन्हा घेण्याचे निर्देश दिले. नागपूर जिल्हा काँग्रेसची शुक्रवारी झालेली बैठक थेट प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी अवैध घोषित करणे केल्याने राज्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरला होता.
advertisement
काँग्रेसमधील गटबाजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आली
हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्ह्याध्यक्ष अश्विन बैस यांना बैठक पुन्हा घेण्याबाबत पत्र लिहिले आहे. यानिमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आली असून आजच्या बैठकीला सुनील केदार उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले आहे.
नक्की प्रकरण काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरीता इच्छुक नेत्यांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूर जिल्हाध्यक्षांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीपासून निवड मंडळांच्या प्रतिनिधींना दूर ठेवण्यात आले होते. याचीच दखल प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी घेतली असून पक्षाने नियुक्त केलेल्या निवड मंडळांच्या प्रतिनिधींना सन्मानाने बैठकीला बोलवा, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिले आहेत.
नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज
राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आतापर्यंत ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. या अर्जांची छाननी सुरु असून १२ तारखेला राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होत आहे, या बैठकीत उमेदवारांसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
