राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईतील वरळी डोममधील हॉलमध्ये झाली. या बैठकीला राज्यातील आणि देशभरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली.
advertisement
माझी वाचा गेली असती तर बरं झालं असतं....
दादांच्या अकाली निधनानंतर आम्हा सगळ्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे. माझी मध्यंतरी वाचा गेली होती. तशीच गेली असती तर बरे झाले असते, असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली आहे. कारण आपल्या मुखातून दादांबद्दल शोक व्यक्त करण्याची वेळ आली नसती, असे धनंजय मुंडे म्हणाले.
शरद पवारांच्या पक्षावर धनंजय मुंडे यांची सडकून टीका
महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुनेत्रा ताई व्यवस्थित सांभाळातील असा आम्हाला विश्वास आहे. वहिणींना शपथविधीची घाई झाली होती, आम्ही दबाव टाकत होतो असे म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे. दादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होतात ते काय होते? ज्यावेळी वहिणींनी उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा तुम्हाला वाटले नाही का शुभेच्छा देणारे एक साधे ट्विट करावे? महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला काही कळत नाही? असे धनंजय मुंडे म्हणाले.
FIR घेण्यासाठी मुंबई आणि बारामतीत स्टंट केला
आज त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करणार हे आम्ही आधीच जाहीर केले होते. काल एफआयआर घेतला नाही म्हणून स्टंट केला. आज बारामतीला एफआयआरसाठी स्टंट केला. हे सगळे आमच्या न्यूज किलिंगसाठी केले जात आहे.माझ्या सारख्याला हे खूप किळसवाणे वाटते, असे म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, कुणाला आक्षेप घ्यायचं काय कारण?
पार्थ पवार हे राज्य सभेवर जात आहेत. त्यांना सहा वर्षाची पूर्ण टर्म दिली जात आहे. आमच्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. त्यावर कुणी आक्षेप घ्यायचे काय कारण? दादा असताना दादांवर मिडीया ट्रायल चालवली गेली. आता त्यांच्या कुटुंबावर असे प्रश्न उपस्थित करू नका, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
