यानंतर धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते निखील फड यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून उघडपणे इशारा दिला होता. यानंतर आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय अॅडव्होकेट गोविंद फड यांनी फेसबूक अकाउंटवरून भाजप आमदार सुरेश धस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना उघडपणे धमकी दिली आहे. दोघांविरोधात अत्यंत भडकावू आणि धमकीच्या स्वरूपाचा मजकूर पोस्ट करण्यात आला.
advertisement
संबंधित पोस्टमध्ये गोविंद फडने “Dhananjay munde chya kesa la pun dhakka lagla tar karyarm khalas jarange, suresh dhass- bhandara laaun boltoy” असा मजकूर लिहिल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या मजकूराचा सरळ अर्थ आमदारांना जीवे मारण्याची उघड धमकी असा होत असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊन समर्थकांमध्ये तीव्र संताप पसरू शकतो आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्या प्रतिनिधींविरुद्ध उघड धमक्या देणे ही गंभीर व दंडनीय बाब आहे. सामाजिक माध्यमांचा गैरवापर करून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप धस समर्थकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी समर्थकांनी केली आहे.
