धाराशिव - सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आदिशक्ती मातेचा जागर केला जात आहे. याच निमित्ताने आज आपण धाराशिवच्या भूम शहरात तब्बल 11 वर्षांपासून जिजाऊ महिला मंडळाकडून साजरा केला जाणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाबाबत जाणून घेणार आहोत.
धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील जिजाऊ महिला मंडळाकडून शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी मंडळातील महिला पायी भवानी ज्योत देखील आणतात. त्याचबरोबर नवरात्र महोत्सवा निमित्त महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवतात.
advertisement
मागील 11 वर्षांपासून जिजाऊ महिला मंडळाकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या मंडळामध्ये 11 वर्षांच्या मुलींपासून ते वयोवृद्ध महिला सहभागी आहेत. इतकेच नाही तर महिलांनी समोर येत नवरात्र उत्सव मंडळ स्थापन केले आहे आणि विशेष म्हणजे या नवरात्र महोत्सवाची वर्गणीही महिलाच गोळा करतात.
महिलांनी सुरू केलेले हे शारदीय नवरात्र महोत्सव मंडळ महिलांच्या आरोग्याबाबत आरोग्य शिबिर त्याचबरोबर महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवते. महिलांनी समाजात समोर येत जिजाऊ महिला मंडळ स्थापन केले आणि या मंडळामार्फत आरोग्य विषयक शिबिर, विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवण्यात येतात, ही बाब अनेक महिला भगिनींसाठी प्रेरणादायी आहे, अशा भावनाही व्यक्त केल्या जात आहे.