नेमकी घटना काय?
आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव समृद्धी कृष्णकांत पांडे (२५, रा. मंजिरा अपार्टमेंट, शिव कैलास, मिहान) असं आहे. समृद्धी 'एम्स'मध्ये त्वचारोग विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ती २५ जुलैपासून एका मैत्रिणीसोबत मिहान परिसरातील फ्लॅटमध्ये राहत होती. तिची मैत्रीणही त्याच विभागात शिक्षण घेत आहे.
बुधवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी तिची मैत्रीण 'एम्स'मध्ये गेली, त्यावेळी समृद्धी घरी एकटीच होती. रात्री आठ वाजता मैत्रीण फ्लॅटवर परतली तेव्हा दरवाजा आतून लॉक होता. मैत्रिणीने तिच्याकडील चावीने दरवाजा उघडला. तेव्हा समृद्धी हॉलमध्ये ओढणीने सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
advertisement
या घटनेमुळे घाबरलेल्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक गोळा झाले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. सोनेगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.
वडिलांना फोन न उचलल्याने आली शंका
समृद्धीचे वडील कृष्णकांत पांडे हे पुणे येथे 'सीआरपीएफ'चे उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नक्षलग्रस्त भाग तसेच जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिकूल परिस्थितीत काम केले आहे. आपल्या कणखर स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पांडे कुटुंबीयांसाठी समृद्धीच्या या टोकाच्या पावलामुळे मोठा धक्का बसला आहे.
कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीला फोन केला होता, पण तिने बराच वेळ फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांनी तिची प्रकृती ठीक आहे की नाही, या शंकेने तिच्या मैत्रिणीला फोन केला. मैत्रिणीने घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पांडे आणि त्यांचे कुटुंबीय तातडीने नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
समृद्धी पांडे अभ्यासात अत्यंत हुशार होती, पण गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती, अशी माहिती मिळत आहे. तिने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणामुळे उचललं, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.
