नागपूर : भटक्या कुत्र्यांची आक्रमकता लहान मुलांच्या जीवावर कशी बेतू शकते, याचा अत्यंत दुर्दैवी उदाहरण नागपूर जवळच्या पावनगावमध्ये दिसून आला आहे. पावनगावमधील प्रभा सिटी या इमारतीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचताना एका 12 वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पावनगावमधील प्रभा सिटी परिसरात ही घटना घडली. जयेश बोकडे असं मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. जयेश सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास इमारतीच्या खाली इतर मुलांसोबत खेळत होता. अचानक इमारतीच्या आवारात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्याने मुलांवर भुंकणे सुरू केले. आक्रमक झालेल्या कुत्र्यापासून वाचण्यासाठी सर्व मुले इमारतीच्या आत धावले. जिन्यावरून वर चढून काही मुलं आपापल्या घरी सुरक्षित पोहोचले. मात्र जयेश पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या दरम्यान, जिन्यावरच अडकला आणि आक्रमक झालेल्या कुत्र्याने तिथेच त्याला गाठलं. जयेश स्वतःच्या बचावासाठी जिन्यावरील लोखंडी खिडकीवर चढला, मात्र त्या खिडकीला लोखंडी जाळी नसल्यामुळे जयेश तोल जाऊन खाली कोसळला.
जयेश कोसळल्याचं पाहून सोसायटीतील इतर लोक धावत आले. सहाव्या मजल्यावरून खाली कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या जयेशला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या संदर्भात कळमना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश स्वतः प्राणी प्रेमी होता त्याच्या घरी एक ससा आणि छोटा पाळीव कुत्रा असल्याची देखील माहिती आहे, प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या जयेशच्या बळी मात्र एका भटक्या कुत्र्यामुळे गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रथमदर्शनी आणि परिसरातील नागरिकांनी दिलेला माहितीनुसार, यामध्ये कुठलाही घातपात झाला नसून भटक्या कुत्र्यांमुळेच जयेशचा बळी गेला.
