नागपूर : जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताची नाती एकमेकांच्या जीवावर उठली आहे. नागपुरातील मानकापूर परिसरात भावाच्या नात्याला काळिमा फासणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून एका भावाने थंड डोक्याने प्लॅन करून भावाची हत्या केली. पोलिसांनी १३ दिवसांमध्ये या प्रकरणाचं गुढं उकललं आहे. या प्रकरणात जन्मदाती आई, भाऊ आणि वहिनी हे खुनी ठरले आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर भागात ही घटना घडली. सुधीर खंडारे असं हत्या झालेल्या भावाचं नाव आहे. शिवनगरमधील ईरोज सोसायटी राहणारा मोठा भाऊ योगेश खंडारे हा प्रॉपर्टी डिलर आहे. त्याने त्याच्या पत्नी आणि भावाच्या मदतीने स्वतःच्या धाकट्या भावाचा घरातच निर्दयीपणे खून केला. मृतकाचे नाव सुधीर पंढरीनाथ खंडारे असं आहे.
बाथरूममधून पडून मृत्यू
सुधीर खंडारे यांची हत्या केल्यानंतर मोठा भाऊ योगेश खंडारे याने अपघाताचा बनाव केला होता. २ सप्टेंबर रोजी सुधीर यांचा मृतदेह बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आला होता. त्या वेळी कुटुंबीयांनी ‘पाय घसरून मृत्यू’ झाल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी सुधीर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
आई सुद्धा आरोपी
मात्र, पोस्टमार्टम अहवालाने सर्व खोटेपणा उघड केला. सुधीरच्या डोक्यावर झालेल्या जबर मारामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तब्बल १३ दिवसांनी सत्य बाहेर आलं आणि आरोपी मोठा भाऊ योगेश खंडारे, त्याची पत्नी रुपा आणि भाऊ राजेश खंडारे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात सुधीरची आई आणि एका अल्पवयीनालाही आरोपी करण्यात आलं आहे. कुटुंबीयांकडूनच घडलेली ही निर्दयी हत्या उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस आणखी तपास करत आहे.