महानगरपालिका आयुक्त गगराणी म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या नियम व तरतुदींचे पालन करून तयार केलेली २२७ प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखत मतदारांना सुलभ आणि सुरक्षित मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदान केंद्र अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी मतदारांनी आपले संबंधित मतदान केंद्र कोणते आहे, याची आधीच खात्री करून घ्यावी. मतदान प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि मतदारांना सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
advertisement
मतदानासाठी १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी सात परिमंडळांतील २४ प्रशासकीय विभाग कार्यालयानुसार तसेच २३ मध्यवर्ती मतदान केंद्रानुसार एकूण १० हजार २३१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प आदींची सुविधा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्याची पाहणी, पडताळणी केली आहे. मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी मतदान केंद्रानजीक 'मतदार सहाय्य केंद्र' स्थापित करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकंदरीतच, मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व सोयीस्कर पार पडावी यासाठी विविध ठिकाणी आणि विविध स्वरूपाच्या जागांमध्ये मतदान केंद्रांची व्यापक व सुनियोजित व्यवस्था करण्यात आली आहे, असे देखील श्री. गगराणी यांनी नमूद केले.
मतदान केंद्रांची विगतवारी लक्षात घेता, एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे विविध प्रकारच्या इमारती व जागांमध्ये उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी ४ हजार ३८६ मतदान केंद्रे शासकीय / निमशासकीय इमारतींमध्ये स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये २ हजार ३८७ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ८८० मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर १ हजार १११९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये राहणार आहेत.
सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एकूण ७०२ मतदान केंद्रांची व्यवस्था
तसेच, सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एकूण ७०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १८१ मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, ३१२ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तर २०९ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय, खासगी इमारतींमध्ये एकूण ५ हजार १४३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये २ हजार ७१० मतदान केंद्रे बंदिस्त जागांमध्ये, १ हजार ३७८ मतदान केंद्रे अर्धबंदिस्त जागांमध्ये, तसेच १ हजार ५५ मतदान केंद्रे खुल्या जागांमध्ये असतील.
