राजकारणात नाती खुजी ठरतात असं म्हटलं जातं. त्यामुळे आज राज्यातील अनेक बड्या राजकीय घरण्यांमध्ये भाऊबंदकी पाहायला मिळतेय. भाऊ विरुद्ध भाऊ, काका विरुद्ध पुतण्या आणि भाऊ- बहिणीतील राजकीय वादही जनतेनं पाहिला आहे. पण आता बाप - लेकीत राजकीय सामना रंगणार आहे. राज्याचे अन्न, औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर हे आमने-सामने आले आहेत. त्यामुळेच धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलगी भाग्यश्री यांच्यावर सडकून टीका केली आहे.
advertisement
भाग्यश्री आत्राम-हलगेकर या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहेत.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना शरद पवारांच्या पक्षाकडून धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेचं धर्मरावबाबा आत्रामांनी शरद पवारांवरही टीकास्त्र डागलंय. धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलगी आणि जावयाशी असलेले संबंध तोडल्याचं जाहीर केलं. मात्र त्यांनी मुलगी- जावयाला नदीत बुडवण्याची भाषा केल्यामुळे विरोधकांनी आत्राम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एकीकडं आत्रामांनी मुलीशी असलेले नातेसंबंध तोडल्याचं जाहीर केलं तर दुसरीकडं अजित पवारांनी स्वानुभवातून भाग्यश्री आत्राम यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
गडचिरोलीतील आहेरी विधानसभा मतदारसंघावर आत्राम घराण्याचा पगडा आहे. खरं तर धर्मरावबाबा आत्राम हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. अशातचं त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांनी विधानसभेसाठी जुळवा जुळव सुरु केली आहे. त्यामुळेचं आहेरी विधानसभेत बाप-लेकीत लढत रंगण्याची शक्यता आहे.
