गडचिरोली : महिला माओवाद्यांची पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या सहा वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रीय असलेल्या राधा उर्फ नेल्सोची हत्या करण्यात आली. माओवाद्यांनी तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याचं आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राधा उर्फ नेल्सो ही माओवादी चळवळीत सक्रीय होण्याआधी वैद्यकीय शिक्षण घेत होती. उच्चशिक्षित असताना तिने ही वाट निवडली होती.
advertisement
माओवादी चळवळीत वरिष्ठ नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राधावर होती. मात्र ती पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय माओवाद्यांना होता आणि यातूनच तिची हत्या करण्यात आलीय. छत्तीसगढ आणि तेलंगणा सीमेवर माओवाद्यांनी राधा उर्फ नेल्सोची हत्या करून मृतदेह फेकून दिला. २०१८ पासून राधा माओवादी चळवळीत सक्रीय झाली. तिच्यावर माओवादी नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली होती.
दरम्यान, माओवाद्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मर्जीतली असलेली राधा पोलिसांच्या संपर्कात आली होती. माओवाद्यांच्या संघटनेची माहिती तिने पोलिसांना पुरवायला सुरुवात केली होती अशी माहिती मिळाल्याने तिची हत्या करण्यात आली. तेलंगाना छत्तीसगड सीमेवरील कोत्तागुडम जिल्ह्यातील जंगलात तिचा मृतदेह फेकण्यात आला. ती पोलिसांच्या संपर्कात असल्यामुळे तिची हत्या केल्याची माहिती माओवाद्यांच्या विभागीय समिती सचिव गणेश याने पत्रकातून हत्येची कबुली दिली आहे.
राधावर पोलिसांकडून आत्मसमर्पणासाठी दबाव टाकला गेला होता. तिच्या भावाला गुप्तचर विभागात नोकरी दिली होती. तर मैत्रिणीमार्फत तिला आत्मसमर्पणासाठी दबाव टाकला. तेव्हा आत्मसमर्पणाऐवजी तिने चळवळीची माहिती देण्याचं मान्य केलं होतं. यानंतर अनेक नक्षली कारवायांची माहिती तिने पोलिसांना दिली होती. याची कुणकुण लागताच तिला कमांडर पदावरूनही हटवलं होतं. शेवटी तिची २१ ऑगस्टला हत्या केली गेली.
