गोंदियामधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल भाजपला राम राम ठोकत घरवापसी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज पत्रकार परिषद घेऊन ते काँग्रेस प्रवेशाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र आता अग्रवाल हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे.
advertisement
गोपालदास अग्रवाल हे आज पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे, तर १३ सप्टेंबरला त्यांचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अग्रवाल यांनी पाच वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.
