गोंदियामध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या महामेळावा होत असून या मेळाव्याला काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोपाल अग्रवाल आणि त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.
कोण आहेत गोपाल अग्रवाल?
माझी आमदार गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून २ वेळा विधानपरिषद तर ३ वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. काँग्रेसमध्ये असताना ते लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत.
advertisement
त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच गोपाल अग्रवाल यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र झालेल्या निवडणुकीत गोंदिया विधानसभेतून अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला होता.
भाजपमध्ये असूनही त्यांचे मन तिकडे रमत नव्हते. पाच वर्षे भाजपमधल्या प्रवासानंतर पुन्हा घरवापसी करून ते काँग्रेसतर्फे गोंदिया विधानसभा लढतील. यावेळीही विनोद अग्रवाल त्यांच्या समोर विरोधक म्हणून असतील.
काँग्रेसचा १७२ मतदार संघाचा आढावा पूर्ण
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याचे काम सुरु असून आतापर्यंत काँग्रेस पक्षाने १७२ मतदार संघाचा आढावा घेतला आहे. २५ तारखेपर्यंत सर्व २८८ मतदार संघाचा आढावा पूर्ण होईल. राज्यातील वातावरण मविआसाठी अनुकुल आहे, परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता बनलेली असून भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून २/३ बहुमताने मविआचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
