राजकीय मतभेद बाजूला सारून रंगलेल्या त्यांच्या एका अनोख्या डान्सची सध्या चर्चा सर्वत्र रंगली आहे. इंदापूर स्पोर्ट्स अँड हेल्थ फाउंडेशनच्या वतीने 'इंद्रेश्वर मॅरेथॉन सिझन-१' स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या सांगता समारंभात आजी-माजी मंत्र्यांनी चक्क 'झिंगाट' गाण्यावर ठेका धरल्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
राजकीय वैर विसरून 'झिंगाट' गाण्यावर डान्स
इंदापूरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे या मॅरेथॉनच्या निमित्ताने एकाच मंचावर आले होते. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, वातावरणात उत्साह भरला होता. 'सैराट' चित्रपटातील लोकप्रिय गाणे 'झिंग झिंग झिंगाट' वाजताच या दोन्ही दिग्गज नेत्यांसह नगराध्यक्ष भरत शेठ शहा यांनीही डान्स केला. मैदानावर उपस्थित असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांसमवेत या तिन्ही नेत्यांनी गाण्याच्या तालावर जोशात डान्स केला.
advertisement
या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजकीय मतभेद बाजुला ठेवून दोन्ही नेते एकत्र आल्याने त्यांचं कौतुक होतं आहे. इंदापूर स्पोर्ट्स अँड हेल्थ फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनमध्ये तीन प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात१० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर असे तीन प्रकार होते. या स्पर्धेसाठी इंदापूर शहरातील खेळांडूंनी उदंड प्रतिसाद दिला.
