महाराष्ट्राची उपराजधानी आणि आजवर हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक म्हणून असलेलं नागपूर शहर. पण, हेच धार्मिक एकता जपणारं नागपूर सोमवारी रात्री जातीय दंगलीत होरपळलं. नागपूरच्या महाल परिसरात उसळलेला दंगलीच्या वणव्या इतका प्रचंड होता की यात काही घरांसह वाहनं आणि दुकानांतीही राखरांगोळी झाली.. दंगलखोरांचा दगडफेक, जाळपोळीचा फटका पोलिसांनाही बसला..
या हल्ल्यात तीन पोलीस उपायुक्त , 34 पोलीस जखमी झाले आहेत. तर एका पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीनं हल्ला झाल्याचं समोर आलंय. मोठ्या प्रमाणात पोलीस जखमी झाल्यानं, सरकारकडून पोलिसांना ढाल म्हटलं जातंय. पण, त्याचवेळी या दंगलीत ज्याचं नुकसान झालं, ते पीडित मात्र पोलिसांच्या भूमिकेवरच संशय उपस्थित करतायेत.
advertisement
विशेष म्हणजे, ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन केलं, त्यांनीही पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईविरोधात रोष व्यक्त केलाय. एवढंच नाही, तर या दंगलीसाठी पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली जातेय..
पोलिसांनी मात्र दिरंगाईचे आरोप फेटाळले आहे. महाल, भालदारपुरी भागात जमाव आक्रमक झाल्यानं, पोलीस तिथे अडकल्याचे पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे. पण, हंसापुरी भागात पोलीस उशिरा का पोहोचले, याची चौकशी करणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय..
बाहेर येवून जमाव नागपुरात हिंसा करतो, हे गृहविभागाचं आणि पोलिसांचं अपयश असल्याची टीका आता विरोधकांना सुरू केलीय. कालच्या घटनेचे गांभीर्य पोलिसांना कसे कळले नाही, असे विरोधक विचारीत आहेत.
एकंदरीतच, महालस, भालदारपुरी आणि हंसापुरी भागात उसळलेल्या दंगलीनं नागपुरच्या कायदा व सुव्यवस्थेला डाग लावला आहे. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघातच हिंदू-मुस्लिम दंगल घडली. पोलिसांनी दोन्ही जमावांना पांगवण्यासाठी आणि दंगलखोरांना रोखण्यासाठी प्रयत्न केले, ज्यात अनेक पोलीस जखमीही झाले. पण, त्याचवेळी पीडितांकडून पोलिसांवरही आरोप केले जातायेत. त्याचीही सत्यता समोर यायला हवी. नागपूर पेटवणाऱ्यांचा शोध घेतानाच, कुणामुळे नागपूरकर दंगलीत होरपळले? आंदोलनांनी यात तेल ओतलं का? याचाही पारदर्शकतेनं शोध घेणं गरजेचं बनलंय.
