नेमकं प्रकरण काय?
परवीन उर्फ मुस्कान (वय २६) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती तहा अन्सारीला अटक केली आहे. ३० ऑगस्ट रोजी ईदगाह झोपडपट्टीजवळच्या दलदलीत महिलेचं शीर आढळल्यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद कुंभार आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील माहिती काढताना, त्यांना मुस्कान नावाची एक महिला गेल्या काही दिवसांपासून दिसत नसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला. यानंतर संबंधित मृतदेह मुस्कानचा असल्याचं तपासात समोर आलं.
advertisement
यानंतर, पोलिसांनी मुस्कानबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचा पती तहा अन्सारी देखील घरी नसल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी त्याचा शोध घेत १ सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली असता, त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.
इन्स्टाग्राम रिल्सवरून वाद
तहा अन्सारी आणि मुस्कान अन्सारी यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक वर्षाचा मोहम्मद अजलान नावाचा मुलगाही आहे. दोघांमध्ये चारित्र्यावरुन सतत वाद होत होते. मुस्कान इन्स्टाग्रामवर रिल्स बनवायची, त्यामुळे त्यांच्यात आणखी वाद व्हायचं. शिवाय रिल्समुळे तिला काही मुलं भेटायला यायचे, यामुळे त्यांच्यातील भांडणं आणखी वाढली होती. २८ ऑगस्ट रोजी मुस्कान रिल्स बनवण्यासाठी घरातून बाहेर गेल्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला होता.
याच भांडणातून २९ ऑगस्ट रोजी पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. त्याने पत्नीचं शीर धडावेगळं करून मृतदेहाचे दोन तुकडे केले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी भरतीच्या पाण्यात फेकून दिले. अजूनही मृतदेहाचं धड आढळलेलं नाही, त्यामुळे पोलीस खाडी परिसरात शोध घेत आहेत. आरोपी पतीला भिवंडी न्यायालयात हजर केलं असता, त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे एक वर्षाचा चिमुकला मोहम्मद अजलान पोरका झाला आहे. त्याच्यासमोरच बापाने आईची हत्या केल्याने या चिमुकल्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. सध्या नातेवाईक त्याचा सांभाळ करत आहेत.