नाशिक : महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेले दिसून आले. तिकीट वाटपावरून जवळपास सर्वच पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्या, तरी सर्वाधिक गदारोळ भारतीय जनता पक्षात पाहायला मिळाला. दीर्घकाळ पक्षासाठी झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते आणि अलीकडेच पक्षात दाखल झालेले नेते यांच्यातील संघर्ष रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे यंदाची नाशिक महापालिका निवडणूक ही केवळ सत्तास्पर्धा न राहता, अंतर्गत नाराजी, गटबाजी आणि राजकीय डावपेचांची मोठी परीक्षा ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
advertisement
भाजपने यावेळी तब्बल 33 ‘आयाराम’ नेत्यांना थेट उमेदवारी देत रेड कार्पेट घातल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे, अनेक जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते डावलले गेल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला. बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आल्यामुळे दिवसभर भाजप कार्यालय आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ठिकाणी नाराजीचे नाट्य सुरू होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी उघडपणे पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी शांत राहून भविष्यातील भूमिका ठरवण्याचे संकेत दिले.
कोणत्या ‘आयाराम’ नेत्यांना उमेदवारी?
यंदाच्या निवडणुकीत भाजपने शाहू खैरे, अदिती पांडे, बबलू शेलार, हितेश वाघ, ऐश्वर्या लाड, गौरव गोवर्धने, सागर लामखेडे, गुरमीत बग्गा, नीलम पाटील, खंडू बोडके, चित्रा तांदळे, मनीष बागूल, उषा बेंडकुळे, दिनकर पाटील, अमोल पाटील, संगीता घोटेकर, मानसी शेवरे, बाळा निगळ, सविता काळे, सोनाली भोंदुरे, सचिन मराठे, प्रशांत दिवे, शोभा सातभाई, नीलम गडाख, शाम गोहाड, सुनीता कोठुळे, नयना घोलप, जयश्री गायकवाड, राजेंद्र महाले, सुधाकर बडगुजर, दीपक बडगुजर, हर्ष बडगुजर योगिता हिरे आणि भूषण राणे यांना उमेदवारी दिली आहे. यापैकी अनेक नेते नुकतेच इतर पक्षांतून भाजपमध्ये दाखल झाले असल्याने जुन्या कार्यकर्त्यांचा संताप अधिक तीव्र झाला आहे.
कोणाला डावलले?
तिकीट वाटपात सतीश सोनवणे, कमलेश बोडके, शाहीन मिर्झा, वर्षा भालेराव, शांताराम घंटे, सुनील केदार, प्रशांत जाधव, गणेश मोरे, राहुल कुलकर्णी, अमित घुगे, ज्ञानेश्वर काकड आणि रोहिणी नायडू यांसारख्या नावाजलेल्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. “वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करूनही अखेरच्या क्षणी दुर्लक्ष झाले,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या नाराजीचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात?
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांनी मोठ्या ताकदीने उमेदवार उभे केले आहेत. भाजपने ११८ उमेदवार दिले असून प्रभाग क्रमांक १४ मध्ये एकही उमेदवार दिलेला नाही. शिवसेना (शिंदे गट) ८०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४१, शिवसेना (ठाकरे गट) ८२, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३१, मनसे ३४, आम आदमी पार्टी ३५, माकप ९ आणि काँग्रेसने २२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
एकूणच, नाशिकची ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांवर नव्हे, तर पक्षांतर्गत समीकरणे आणि नाराजी कशी हाताळली जाते, यावरही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
