पण जर या सगळ्यात तुमच्या करिअरच्या यशात आजीचा मोठा वाटा असेल आणि एके दिवशी तुम्ही तिलाच तुमचं कर्तुत्व सिद्ध केलंत तर त्याहून सूख ते आणखी काय?
सध्या इंटरनेटवर असाच एक भावूक करणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. इंडिगो एअरलाईन्सची कॅप्टन श्रुति हिने आपल्या आजीसाठी जे केलं, ते पाहून हजारो नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.
advertisement
श्रुतिने हा व्हिडिओ शेअर करताना एक जुनी आठवण सांगितली आहे. 15 वर्षांपूर्वी जेव्हा श्रुति 'एअर इंडिया'च्या एन्ट्रन्स एक्झामची तयारी करत होती, तेव्हा ती अभ्यासासाठी तिच्या आजीच्या घरी राहायला गेली होती. आजीच्या घरात राहून पाहिलेलं ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आहे. आपल्या आजीला स्वतः पायलट असलेल्या विमानात बसवून उडवणं, हे श्रुतिसाठी तिचं 'जीवनचक्र' पूर्ण झाल्यासारखं आहे.
पुणे ते दिल्ली या प्रवासादरम्यान श्रुतिने जेव्हा माईक हातात घेतला, तेव्हा प्रवाशांना वाटलं की ही नेहमीचीच अनाऊन्समेंट असेल. श्रुतिने आधी इंग्रजीत माहिती दिली, पण नंतर तिने खास हिंदीतून संवाद साधायला सुरुवात केली. तिने अभिमानाने सांगितलं की, "आज या विमानात माझी एक अतिशय खास पाहुणी बसली आहे. ती म्हणजे माझी नानी."
श्रुति पुढे म्हणाली की, तिची आजी पहिल्यांदाच तिच्यासोबत विमानात प्रवास करत आहे आणि हा क्षण तिच्यासाठी आयुष्यातील सर्वात अभिमानाचा आहे. श्रुतिचे हे शब्द ऐकून बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला नानी कौतुकाने सांगत होती, "बघा, जी मुलगी अनाऊन्समेंट करतेय ना, ती माझी नात आहे."
आजीच्या डोळ्यांतील ते आनंदाश्रू सर्व काही सांगून जात होते. इंग्रजी अनाऊन्समेंट इंग्रजीत होती त्यामुळे कदाचित त्यांना पूर्ण समजली नसेल, पण जेव्हा त्यांच्या नातीने त्यांचं नाव घेतलं तेव्हा आजीला झालेला आनंद गगनात मावेनासा होता. आपल्या लेकीला पायलट म्हणून पाहताना एका आईला जेवढा आनंद होतो, त्यापेक्षा कैक पटीने जास्त सुख तिच्या आजीच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
श्रुतिने (@livininversatility) इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या रीलवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिलंय, "काय तो क्षण होता! आपल्या स्टार पायलटची ती हास्यमुद्रा आभाळालाही उजळून टाकत होती. तुमच्या या प्रवासाचा भाग झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!"
श्रुतिने हा खास क्षण तिचे कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवाराला समर्पित केला आहे, ज्यांनी तिला आजवर साथ दिली. हा व्हिडिओ केवळ एका यशाची गोष्ट नाही, तर नात्यांमधील ओलावा आणि कृतज्ञतेची एक सुंदर जाणीव आहे.
