मूळच्या केरळमधील असलेल्या अंजना कृष्णा यांचा जन्म ज्या भागात झाला, तो परिसर बेकायदेशीर खाणकामासाठी कुप्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे तिकडच्या परिसरात अवैध खाणकाम होते. हेच अधोरेखित करून माझ्या मुलीसाठी हे सगळे नवीन नाही. अवैध काम बघत बघतच ती लहानाची मोठी झाली आहे, असे अंजना कृष्णा यांचे वडील व्ही आर विजू यांनी 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना म्हणाले.
advertisement
अवैध खाणकामाचा गंभीर प्रश्न तिला चांगलाच ज्ञात आहे. मकुन्नीमाला या ठिकाणी अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन होत आहे, ते आमच्या घरापासून फक्त दीड किलोमीटर दूर आहे. अवैध खाणकाम, प्रशासनाची भूमिका याबद्दल ती जाणून आहे, असे अंजना कृष्णा यांचे वडील व्ही आर विजू यांनी सांगितले.
अंजना लहानपणापासूनच धाडसी आणि स्पष्टवक्ती
अंजना कृष्णा या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील विलावुर्कल गावातून आयपीएस होणाऱ्या पहिल्याच अधिकारी आहेत. अंजना या २०२२-२०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सनदी सेवा परीक्षेत देशातून ३५५ व्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या. अंजना कृष्णा यांच्या वडिलांचा छोटासा कापड व्यवसाय आहे. त्यांच्या मातोश्री या केरळच्या सखीना येथील न्यायालयात क्लर्क आहेत. अंजना कृष्णा यांना एक लहान भाऊ आहे, तो सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
मुलीविषयी बोलताना व्ही आर विजू यांनी सांगितले, अंजना या भागातील पहिलीच यशस्वी सनदी अधिकारी आहे. अंजना लहानपणापासूनच खूप धाडसी, स्पष्टवक्ती आहे. तसेच प्रामाणिकपणे जगण्यावर तिचा विश्वास आहे. तिला कोणालाही त्रास देण्याची किंवा दुखावण्याची अजिबात सवय नाही.
अजित पवार यांच्याशी झालेल्या कॉलनंतर कुटुंबात काय वातावरण होतं?
अजित पवारांसोबत अंजना कृष्णा यांची वादावादी झाली. संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली. कुटुंबाला या गोष्टी कळाल्यानंतर घरात काय वातावरण होते? असे विचारल्यावर ते म्हणाले, "हे सगळे होऊनही अंजना खूपच शांत होती. ती खूप संयमी आहे. या फोनचा परिणाम तिच्या कामावर अजिबातही झालेला नाही"
शेकडो लोकांचे आम्हाला फोन आले...
तसेच कामाविषयी ती कधीच आमच्यासोबत चर्चा करीत नाही. अधिकृत माहिती ती कधीही आम्हाला सांगत नाही किंबहुना आम्हीही शासकीय कामावर तिच्याशी संवाद करीत नाही. अजित पवार यांच्याशी अंजनाचा फोन झाल्यावर आणि देशभरात त्याची चर्चा झाल्यानंतरही कुणीही आमच्या मुलीबद्दल वाईट बोलत नाही, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. विविध बातम्या आल्यावर कुटुंबाला खूप फोन आले. मित्र, नातेवाईकांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. सगळेच जण अंजनाच्या धाडसाचे कौतुक करीत होते, तिचा अभिमानाने उल्लेख करीत होते.
अंजना आयपीएस कशा झाल्या? वडिलांनी यशोगाथा सांगितली
अंजना कृष्णा यांनी लहानपणी प्रचंड गरिबी पाहिलेली आहे. अतिशय गरिबीत वाढलेल्या, शिक्षण घेतलेल्या आणि स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांचा इथपर्यंतचा प्रवास झाला. पहिल्या तीन प्रयत्नांत अंजना कृष्णा यांना पूर्व परीक्षाही उत्तीर्ण करता आली नाही. परंतु त्यांनी धीर सोडलेला नव्हता. चौथ्या प्रयत्नांत त्यांनी पूर्ण, मुख्य आणि मुलाखतीतही बाजी मारून देशात ३५५ वा क्रमांक मिळवला. त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेत झाली. तिला डॉक्टर बनविण्याचे आम्ही स्वप्न पाहिले होते, परंतु बारावीनंतर तिने सनदी सेवेत जाण्याचा निर्णय आम्हाला सांगितला. त्यावर आम्हीही तिच्या स्वप्नांना बळ देण्याचा निर्णय घेतला, असे अंजना यांच्या वडिलांनी सांगितले.
तीन वेळा सलग अपयशी ठरल्यावर सहसा कोणीही निराश होईल. पण तिला तिच्या अभ्यासावर प्रचंड विश्वास होता. पोलीस अधिकारी होणारच हे तिने मनाशी नक्की केले होते. ती तीन वेळा अपयशी ठरली, त्या काळात आमचे बरेच पैसे तिच्या कोचिंगवर गेले. परंतु आम्ही कधीच पैशांची काळजी केली नाही. केवळ प्लॅन बी असावा यासाठी आम्ही तिला इतरही परीक्षा देण्यास सांगितल्या. तिने रेल्वे भरती बोर्डाची (RRB) क्लर्कची परीक्षा दिली, त्यातही ती उत्तीर्ण झाली. परंतु रुजू होण्यास तिने सहा महिन्यांचा वेळ मागून घेतला आणि त्याच काळात तिची आयपीएस म्हणून निवड झाली, असे व्ही आर विजू यांनी सांगितले.