मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय पीडित तरुणी मूळची ठाणे जिल्ह्याच्या भाईंदर येथील रहिवासी आहे. ती दिवाळीच्या निमित्ताने जळगावात तिच्या मामाकडे आली होती. शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) सायंकाळी ती आपली आई आणि मावशीसोबत जळगावातील नयनतारा मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. चित्रपट सुरू असताना ती मॉलच्या बाथरूममध्ये गेली.
ती बाथरूममध्ये असताना, एका अज्ञात व्यक्तीने तिचा अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ काढला. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर तिने घाबरलेल्या अवस्थेत आपल्या आई-मावशीला याबद्दल माहिती दिली.
advertisement
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
मॉलसारख्या गर्दीच्या आणि सुरक्षित ठिकाणी असा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जळगाव शहर पोलीस आता मॉल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.
