नेमकं काय घडलं?
जालना शहरातील हकीम मोहल्ला भागात मयत मोहम्मद इकलाख आणि आरोपी मोहम्मद सकिर हे एका भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते. 25 सप्टेंबर रोजी दोघेजण सोबत मद्यपान करत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. आरोपी मोहम्मद सकिर याने मोहम्मद इकलाखची दाढी ओढली, यावरून दोघांमध्ये शिवीगाळ करत जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात आरोपीने मोहम्मद इकलाख यांना बरगडीसह पाठीवर लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीमुळे मोहम्मद इकलाख यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
तपासणीनंतर डॉक्टरांना संशय
रात्री खून केल्यानंतर, आरोपी मोहम्मद सकिर याने दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला आणि 'झोपेत मृत्यू झाला' असा बनाव डॉक्टरांसमोर केला. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना संशय आला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मोहम्मद इकलाख यांचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आणि आरोपीचा बनाव उघडकीस आला.
खुनाचा गुन्हा दाखल
दरम्यान, या घटनेनंतर एपीआय आरती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम पोलिस ठाण्यात आरोपी मोहम्मद सकिर बाबू याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच दिवशी आरोपीला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.