वखारीत लाकूड फोडणाऱ्या मजुराची बायको नगरसेवक झाली
संगीता रामचंद्र भालेराव यांनी प्रभाग क्रमांक सहा (ब) मधून वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षित जागेवरून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर शरद पवार यांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते. या सगळ्यांना मात देऊन संगीता भालेराव यांनी विजय मिळवला.
संगीता भालेराव यांच्या घरची परिस्थिती अगदी बेताची. त्यांचे पती रामचंद्र भालेराव हे वखारीत लाकडं फोडण्याची कामं करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांच्या संसाराचा गाडा चालतो. संगीता भालेराव यांची मुलेही छोटी मोठी कामे करून संसाराला हातभार लावतात.
advertisement
प्रस्थापित राजकारणी आणि घराणेशाहीच्या बाहुगर्दीत सामान्य कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळणे हे अगदी दुरापास्त होऊन बसले आहे. परंतु वंचित वर्गातील व्यक्तींना उमेदवारी देण्याची हिम्मत वंचितनेच दाखवली. संगीता भालेराव यांनीही मायबाप मतदारांसमोर जाऊन 'निवडून आले तर तुमचे प्रश्न सोडवेन', असा शब्द दिला. आपल्या सारखीच परिस्थिती असलेली एक सामान्य घरातील स्त्री निवडणूक लढतेय, तिला आपण साथ दिली पाहिजे, असा विचार करून मतदारांनी संगीता भालेराव यांना भरघोस मते दिली. १८९५ मतांपैकी जवळपास ५०० मते घेऊन संगीता भालेराव निवडून आल्या.
आतापर्यंत संसारासाठी काबाडकष्ट केले, लेकराबाळांना सांभाळले. आता जामखेड नगर परिषदेची, प्रभाग क्रमांक सहाची नगरसेवक म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढची पाच वर्षे कष्ट करेन, असे संगीता भालेराव यांनी सांगितले.
भटक्यांसाठी काम करणारे अरूण आबाही नगरसेवक झाले!
कोल्हाटी समाज ही महाराष्ट्रातील एक भटकी जमाती. पारंपरिकरित्या तमाशा, लावणीचे खेळ सादर करण्याचे काम वर्षानुवर्षे ते करतात. या सगळ्यात कोल्हाटी समाजातील मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. हेच ओळखून समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी गेली अनेक वर्षे अरूण आबा जाधव काम करतायेत. यंदा त्यांनी जामखेड नगर परिषदेची निवडणूक लढवण्याचे ठरवले. ज्या समाजाच्या स्वप्नातही निवडणुकीचे तिकीट, निवडणूक प्रक्रिया अशा गोष्टी येत नाहीत, तिथे अरूण आबांनी धाडस केले. प्रभागातील नागरिकांसाठी गेली अनेक वर्षे काम करत असल्याने मतदारांनी त्यांना मोठा पाठिंबा दर्शवला. प्रभाग क्रमांक सहामधून १८९५ मतांपैकी ७६४ मते घेऊन त्यांनी दणदणीत विजय मिळवला.
आमच्या जातीची मते नाहीत, आमच्याकडे पैसे नाहीत, प्रस्थापित घरातून आम्ही येत नाही, परंतु आम्हाला लोकांसाठी काम करायचे आहे. पण असे असताना कोणताही राजकीय पक्ष आम्हाला उमेदवारी देत नाही. ही हिम्मत वंचित बहुजन आघाडीने दाखवली. पुढची पाच वर्षे जामखेडकरांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. आजपर्यंत रस्त्यावर लढून लोकांचे प्रश्न सोडवायचो. आता सभागृहात बसून लोकांचे प्रश्न मांडेन, असे अरूण आबा जाधव यांनी सांगितले.
ज्या समाजाच्या नशिबी आजपर्यंत केवळ दु:ख, अपमान, अन्याय, संघर्ष आला त्याच समाजातील माणसं लोकप्रतिनिधी म्हणून आता प्रभागातील लोकांवर अन्याय होऊ नये, त्यांचे जीवनमान बदलावे, त्यांचा उत्कर्ष व्हावा, यासाठी काम करणार आहेत, हे केवढं मोठंय!
