मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे अशी बेपत्ता असलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. या चारही नगरसेवकांशी संपर्क होत नसल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे. नगरसेवकांचा शोध घेण्यात पोलिसांकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
advertisement
विविध ठिकाणी पोस्टर लावण्यास सुरुवात
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पोलिसांनी तातडीने नगरसेवकांचा शोध घ्यावा, नाहीतर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर शोधू, असे राऊत म्हणाले होते. संजय राऊत यांच्या इशाऱ्यानंतर आज कल्याण पूर्व परिसरात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी विविध ठिकाणी पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांमध्येही उत्सुकता
या पोस्टरवर बेपत्ता नगरसेवकांचे फोटो झळकवण्यात आले असून “कुणालाही आढळून आल्यास शिवसेना शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोस्टरबाजीमुळे कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले असून नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
एकीकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत असताना, दुसरीकडे बेपत्ता नगरसेवकांचे नातेवाईक, कुटुंबीय आणि शेजारी यांनी पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
