कल्याण: कल्याणमध्ये केडीएमसीच्या वसंत व्हॅली रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे आरोग्यसेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एक दिवसाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असून तीन दिवसाचा ऑक्सिजन देणार असल्याचे सांगत एकही दिवस न दिल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मृत्यूला रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
advertisement
संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, नवजात बालिकेला तीन दिवस ऑक्सिजनवर ठेवले जाईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात एकही दिवस ऑक्सिजन दिला गेला नाही. यामुळेच नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते देखील तिथे पोहेचले आणि त्यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
बाळाला दूध पाजल्यानंतर ढेकर न आल्याने मृत्यू: रुग्णालय
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास रुग्णालयासमोर उग्र आंदोलन केले जाईल. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासन आणि केडीएमसी आरोग्य विभागावर दबाव वाढला आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने आपला निष्काळजीपणा नसल्याचे सांगत बाळाला दूध पाजल्यानंतर ढेकर न आल्याने मृत्यू झाल्याची शंका केली व्यक्त करत बालिकेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे, सत्य बाहेर येईल,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नातेवाईकांची पोलिस स्थानकात धाव
घटनेनंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांकडूनही या प्रकाराची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठा रोष असून, केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
आरोग्यसेवेचा हलगर्जीपणा पुन्हा समोर
प्रसूतीगृहात घडलेली ही घटना केवळ एका बालिकेच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून, संपूर्ण आरोग्यसेवेतील हलगर्जीपणाचा गंभीर मुद्दा समोर आणणारी आहे. अशा घटनांवर कडक कारवाई व्हावी, अन्यथा अन्य कुटुंबांना याची किंमत चुकवावी लागू शकते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा :
दोन दिवस उलटले तरी आयुष कोमकरचा मृतदेह ससूनमध्येच, अंत्यसंस्कार कधी? समोर आली अपडेट
दुचाकीवरून आले, पडघ्याचा रस्ता विचारला अन्.., कल्याणमध्ये वाहतूक कोंडीत घडाला अनर्थ