उद्योगपती राजकुमार जयस्वाल आणि त्यांचे कुटुंब हेलिकॉप्टरने देहरादूनहून केदारनाथच्या दिशेने निघाले होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर गौरीकुंडदरम्यान खाली कोसळल्याची शक्यता आहे. दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाने नियंत्रण गमावले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक डॉ. व्ही मुरुगेशन यांनी दिली.
advertisement
जयस्वाल आमदार दरेकरांकडे गेले, मनातली गोष्ट सांगितली
जयस्वाल यांच्या मृत्यूचे वृत्त आल्यानंतर स्थानिक आमदार संजय दरेकर यांनी हळहळ व्यक्त केली. वणीचे राजकुमार जयस्वाल हे अतिशय चांगले व्यावसायिक तर होतोच पण ते अतिशय उत्तम माणूस होते. धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महायज्ञ सोहळ्याचे आयोजन केले होते, असे आमदार दरेकर यांनी सांगितले.
तसेच केदारनाथला जाण्याआधीच ते माझ्या घरी येऊन गेले होते. आतापर्यंत तीन धामाचे दर्शन घेऊन आलो. आता केवळ केदारनाथ बाकी आहे. जास्त दिवस तिकडे न थांबता, कुटुंबासह दर्शन करून परत येतो, असे ते मला म्हणाले होते, असा प्रसंग आमदार दरेकर यांनी सांगितला.
राजकुमार जयस्वाल यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही
दरम्यान, अजूनपर्यंत उद्योगपती राजकुमार जयस्वाल यांचा मृतदेह सापडलेला नाही. त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मृतदेह वणीत आल्यानंतर आम्ही अंत्यसंस्कार करू, असे आमदार दरेकर यांनी सांगितले.
आमदार संजय दरेकर आणि उद्योगपती राजकुमार जयस्वाल यांचे कौटुंबिक संबंध
आमदार संजय दरेकर आणि उद्योगपती राजकुमार जयस्वाल यांचे कौटुंबिक संबंध होते. राजकुमार जयस्वाल यांचे नेहमी आमदार दरेकर यांच्याशी भेटीगाठी होत. आपापल्या क्षेत्रातील आव्हाने, संधी अशा विषयांवर त्यांची चर्चा होत असे. दोघांमध्ये अतिशय छान मैत्रीपूर्व संबंध होते.
