बेंगलोरवरून कोल्हापुरला येताना घडला अपघात
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, DYSP वैष्णवी पाटील या आपल्या सहकाऱ्यांसह इनोव्हा कारने बेंगलोरवरून कोल्हापूरच्या दिशेने परतत होत्या. रविवारी पहाटेच्या सुमारास चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ त्यांची कार एका लॉरीला मागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, इनोव्हा कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच अंत झाला. मृतांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
advertisement
वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने, या भीषण अपघातातून DYSP वैष्णवी पाटील बचावल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. इतर दोन जखमींवरही उपचार सुरू असून पोलीस त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैष्णवी पाटील यांच्या अपघाताची बातमी समजताच कोल्हापूर पोलीस दल आणि अँटी करप्शन ब्युरोच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी चित्रदुर्ग पोलिसांच्या संपर्कात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अपघाताचे कारण अस्पष्ट
हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्यामुळे चालकाला डुलकी लागली की अन्य काही तांत्रिक बिघाडामुळे कार लॉरीवर धडकली, याचा तपास चित्रदुर्ग पोलीस करत आहेत. इनोव्हा आणि लॉरीची धडक इतकी जोरदार होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.
