एक फूल दो माली हा सिनेमा 1969 मध्ये रिलीज झाला होता. वेगळी स्टोरी आणि सुपरहिट गाण्यांमुळे एक फूल दो माली सिनेमा सुपरहिट झाला होता. आता त्याच सिनेमाला मागे टाकणारा नवा रिअल सिनेमा पाहण्यासाठी सज्ज व्हा. त्या सिनेमाचं नाव आहे 'दो फूल तीन माली' आणि सिनेमातील कलाकार आहेत, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ. हेच ते वाघ आणि वाघिण आहेत, ज्यांच्या 'दो फूल तीन माली' या स्टोरीमुळे 'जंगल में मंगल' होणार आहे.
advertisement
वाघांची फिल्मी स्टोरी कशी फुलणार आहे? वाचा..
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार आणि बाजी हे तीन वाघ होते. मात्र तिथे मादी नसल्यानं त्यांचा वंश वाढत नव्हता. परिणामी वनविभागानं खास 'ऑपरेशन तारा' राबवलं. त्यामुळे वाघांच्या सोबतीसाठी चंदा आणि तारा या दोन वाघिणी दाखल झाल्या आहेत. ऑपरेशन ताराच्या अंतर्गत दोन्ही वाघिणी ताडोबामधून सह्याद्रीच्या कुशीत दाखल झाल्या.
वाघिणींचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे प्रवास कसा झाला?
12 नोव्हेंबर 2025 रोजी ताडोबा अभयारण्यात वाघीण पकडण्याची मोहीम सुरू झाली. 5 वाजता वाघिणीला पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आलं. कागदपत्र, वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर रात्री 10 वाजता कराडच्या दिशेने प्रवास सुरू झाला. 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री वाघीण चांदोलीत दाखल झाली. तिथे पुन्हा वैद्यकीय चाचणी आणि फिटनेस बघून सव्वा तीन वाजता वाघिणीला सॉफ्ट रिलीज करण्यात आलं.
जवळपास 1 हजार किलोमीटर अंतर 27 तास प्रवास करून वाघीण पिंजऱ्यातून चांदोलीत दाखल झाली. चंदा वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रुळताच ताडोबातून तारा वाघीण सह्याद्रीत डेरे दाखल झाली.
दोन वाघिणींमुळे वाघांची प्रजनन क्षमता वाढीस लागणार आहे. परिणामी व्याघ्र प्रकल्पाला नवी ओळख मिळेल असं जंगल अभ्यासकांनी सांगितलं. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. परिणामी सह्याद्रीच्या कुशीत आता वाघांची डरकाळी चांगलीच घुमणार आहे.
