कोल्हापूर : अलीकडे चहाप्रेमींना आकर्षित करण्यासाठी स्पेशल चहा, गवती चहा, इराणी चहा, बासुंदी चहा, लेमन टी, ब्लॅक टी असे चहाचे प्रकार त्यावर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. पण आता या चहामुळे आपल्या खिशाला चांगलीच कात्री बसू शकते. कारण हवामान बदलामुळे चहाची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे देशभरासह कोल्हापुरातल्या चहा व्यापारावरही परिणाम पाहायला मिळतो आहे. यासंदर्भात कोल्हापुरातील दामोदर शिवराम कंपनीचे आणि प्रसिद्ध एचपी चहाचे चेअरमन प्रकाश गद्रे यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, चहाची दरवाढ झाली, याला मुख्य कारण म्हणजे हवामान आहे. अनियमित पावसामुळे आणि अति उष्णतेमुळे आसामसारख्या ठिकाणी, जिथे जास्तीत जास्त चहाचे मळे आहेत, त्याठिकाणी फेब्रुवारी-मार्च दरम्यान चालू होणारा पाऊस लांबला आहे. त्यामुळे अति उष्णतेने ही चहाची झाडे सुखायला सुरुवात झाली आणि त्याचा उत्पादनावर परिणाम झाला.
त्याचबरोबर या झाडांवर अति उष्णता आणि अनियमित पावसाचा परिणामांमुळे कीटकांचाही प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोल्हापुरातील चहा व्यापाराला शतकी परंपरा आहे. कोल्हापुरातील अनेक व्यापाऱ्यांनी आसाम, दार्जिलिंग या भागातून दर्जेदार चहा खरेदी करून त्याचे पॅकिंग आणि ब्रडिंग करून तो चहा कोल्हापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यात विकून चहाचे बँड विकसित केले, असे दामोदर शिवराम आणि कंपनीचे चेअरमन प्रकाश गद्रे यांनी सांगितले.
नवरात्रीत मोसंबीला मागणी, दरही तेजीत, जालना मार्केटमध्ये नेमकी काय आहे परिस्थिती?, VIDEO
भारतातील चहा उत्पादनात घट -
टी असोसिएशन ऑफ इंडिया (TAI) च्या अहवालानुसार 2024 मध्ये भारतातील चहाचे उत्पादन किमान 160 दशलक्ष किलोग्रॅमने कमी होण्याचा अंदाज आहे. अनियमित पाऊस आणि अति उष्णतेसह प्रतिकूल हवामानाचा चहा उत्पादक प्रदेशांवर, विशेषतः आसाम आणि पश्चिम बंगालवर गंभीर परिणाम झाला आहे. किटकांचा प्रादुर्भाव आणि वाढत्या खर्चामुळे उद्योग आणखी ताणला गेला आहे, ज्यामुळे नफ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. टी असोसिएशन ऑफ इंडिया (TAI) ने जाहीर केले की, प्रतिकूल हवामान आणि कीटक समस्यांमुळे 2024 मध्ये चहाचे उत्पादन 160-170 दशलक्ष किलोग्रॅमने कमी होण्याची अपेक्षा आहे. उत्तर पूर्व भारतीय चहा-उत्पादक प्रदेशांना सर्वाधिक फटका बसला आहे, आसाममध्ये उत्पादनात 11% आणि पश्चिम बंगालमध्ये जुलै 2024 पर्यंत 21% घट झाली आहे.
हे आहे चहाचे उत्पादन कमी होण्याचं कारण -
चहा उद्योगात गुंतलेली आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहेत. मे महिन्यातील अतिउष्णता आणि पावसाचा अभाव, अतिवृष्टी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे चहाच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. उत्तर पूर्व भारतीय चहा उद्योगाला प्रतिकूल हवामानामुळे चालू पीक वर्षाच्या जूनपर्यंत 6 कोटी किलोग्रॅम उत्पादनाची कमतरता भासत आहे. एका संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीशी तुलना केली असता देशातील चहाचे उत्पादन कमी होत असल्याचे दिसते. अधिकारी म्हणतात की, पहिल्या आणि दुसऱ्या हंगामात वर्षातील उच्च दर्जाचा चहा तयार होतो. चहाचे कमी उत्पादन चहा उत्पादकांच्या महसुलावर परिणाम करेल आणि त्यामुळे चहाच्या किमती वाढू शकतात.
चहा उत्पादक देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक -
आसाम आणि दार्जिलिंग चहा जगभरातील देशांमध्ये प्रसिद्ध आहे. भारतातील लोकांना चहा प्यायला आवडतो आणि चहाचे उत्पादन आणि वापर या दोन्ही बाबतीत भारत हा अग्रगण्य देश आहे. चहा उत्पादक देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तर चीन पहिल्या क्रमांकावर येतो.