कालव्यावर धुणं धुण्यासाठी गेल्या अन्...
आटेगाव येथील अनुराधा नामदेव कांबळे या ३८ वर्षीय महिला शनिवारी दुपारी दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यावर धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. साधारण ३.३० ते ४.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कालव्याच्या काठावर काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने त्या पाण्यात वाहून गेल्या. त्या घरी न परतल्याने पती नामदेव कांबळे व नातेवाईकांनी कालव्याकडे धाव घेतली, तेव्हा तिथे केवळ त्यांच्या चप्पला आणि भिजलेल्या गोधड्या पडलेल्या होत्या.
advertisement
कालव्याच्या झुडुपात अनुराधा यांचा मृतदेह
या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली. शनिवारी अंधार झाल्यामुळे शोध कार्यात अडथळे आले, मात्र रविवारी सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली. अखेर सरवडे येथील कालव्याच्या झुडुपात अनुराधा यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत सापडला. सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून राधानगरी पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.
उपसरपंच म्हणून कार्यरत
दरम्यान, अनुराधा यांचे पती नामदेव कांबळे हे गावाचे उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आईच्या जाण्याने मुलांनी फोडलेल्या हंबरड्यामुळे अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने कालव्याच्या परिसरात वावरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
