कोल्हापूर: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहे. काहींना तिकीट मिळत आहे तर काही ठिकाणी नाराजीची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी ते विरोधकांच्या गटातून घराणेशाही सुरूच आहे. कोल्हापुरात भाजप खासदार धनंजय महाडीक यांची तिसरी पिढी आता राजरकारणात उतरणार आहे. युट्यूबर आणि फॉर्म्युला रेसिंगचा खेळाडू कृष्णराज महाडिक आता महापालिकेच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करत शक्तिप्रदर्शन केलं.
advertisement
कोल्हापूरचे राजकारण सतेज पाटील आणि महाडिक यांच्या भोवती फिरताना दिसतं. डॉ.डी.वाय पाटील यांच्यानंतर सतेज पाटील आणि त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील अशा तीन पिढ्यांनी राजकारण केल्यानंतर आता महाडिक मागे राहतील कसे. महाडिक यांचीही तिसरी पिढी आता राजकारणात उतरली असून कृष्णराज महाडिक यांनी आज शनिवारी महापालिकेचा अर्ज दाखल करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
कृष्णराज महाडीक यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे. आजोबा महादेवराव महाडिक अनेक वर्षे काँग्रेसचे आमदार होते. वडील सध्या भाजपचे खासदार आहेत. चुलते अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. तर चुलती शौमिका महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान गोकुळ संचालक आहेत. तर कृष्णराज फॉर्म्युला वन या कॅटगरी मधला खेळाडू आहे तसंच, कृष्णराज हे यूट्यूबर म्हणून त्याची महाराष्ट्राला ओळख आहे.
आता राजकीय क्षेत्रात नवी ओळख निर्माण करण्यासाठी कृष्णराज हे मैदानात उतरले आहे. विधानसभा निवडणुकीतही त्याचं नाव चांगलेच चर्चेत होतं. त्यावेळी स्वतःचे राजकीय ब्रॅंडिंग करण्यात त्याला यश आलं होतं. त्याने २५ कोटींचा निधी आणून राजकारणात येण्याचे संकेत दिले होते आता ते सत्यात उतरण्यासाठी मैदानात आले आहे. कोल्हापूरचा विकास करण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचं कृष्णराज यांनी सांगितलंय.
राजकीय वारसदार म्हणून नाही तर स्वतःच्या हिंमतीवर निवडणूक लढवत असल्याचं सांगत त्यांनी या निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर करणारे कृष्णराज महाडिक यांना आता जनतेच्या मनात घर करावं लागणार आहे. त्यामुळे कोल्हापूरची जनता त्यांना स्वीकारणार का हेच पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
