भरत बालाजी सागावे (वय २७, रा. अंबुलगा बु.) असं मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आपल्या छातीत सुरा खुपसून त्याने जीवन संपवले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांनी कर्ज फेडण्यास नकार दिल्याच्या नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भरतचे सहा वर्षांपूर्वी कर्नाटक येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. परंतु तीन वर्षांनंतर त्याने तिला सोडून दिलं आणि निलंगा तालुक्यातील एका दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केले. लग्नानंतर ते पुण्यात राहू लागले. पण तीन महिन्यांपूर्वी त्याची दुसरी पत्नी आजारी पडली. तिच्या उपचारासाठी तरुणाने एक ते दीड लाख रुपये खर्च केले. पण तिचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर तो गावी परतला.
गावी आल्यानंतर पत्नीच्या उपचारासाठी झालेल्या खर्चाचे कर्ज कसे फेडावे, याची चिंता त्याला सतावू लागली. भरतने आपल्या मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांकडे पैशांची मागणी केली. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे नैराश्यातून त्याने निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळील एका आंब्याच्या झाडाखाली सुसाईड नोट लिहून इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत आपल्या छातीत सुरा खुपसून घेतला. तातडीने त्याला लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.