गेल्या तीन-चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता निवडणूक होणार, नंतर होणार असे म्हणत गेली दोन वर्षे सरली. परंतु ओबीसी आरक्षणाचा घोळ मिटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरीस पूर्ण होणे बंधनकारक आहेत. डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत आज अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. चक्रीय आरक्षणात यापूर्वीचे आरक्षण विचारत घेऊन नवे आरक्षण निश्चित करण्यात आले.
advertisement
जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापतीपदापैकी सर्वसाधारण ३, सर्वसाधारण महिलेसाठी ३, ओबीसी प्रवर्गासाठी २, ओबीसी महिलेसाठी २ आणि अनुसूचित जाती आणि जमाती महिलेसाठी ३ पंचायत समितींचे सभापतीपद आरक्षित करण्यात आले आहे.
आधीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या प्रस्थापित नेतृत्वाचा हिरमोड
आधीचा अहमदनगर आणि आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात राजकारण्यांच्या नात्यागोत्यांच्या पॅटर्नची राज्यात चर्चा नेहमीच असते. त्यामुळे आलटून पालटून ठराविक कुटुंबच निवडून येतात किंबहुना सत्तेवर असतात. परंतु आरक्षण सोडतीमुळे संबंधित प्रवर्गातील उमेदवारालाच नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आधीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या प्रस्थापित नेतृत्वाचा हिरमोड झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर, वाचा कुणाला कुठे आरक्षण?
सर्वसाधारण – ३
सर्वसाधारण (महिला) – ३
ओबीसी – २
ओबीसी (महिला) – २
अनुसूचित जाती / जमाती (महिलेसह) – ३
आरक्षणानुसार पंचायत समित्या :
ओबीसी महिला – राहाता, जामखेड
ओबीसी पुरुष – नेवासा, कर्जत
खुला महिला प्रवर्ग – नगर, पारनेर, श्रीगोंदा
अनुसूचित जाती महिला – पाथर्डी
अनुसूचित जाती – संगमनेर
अनुसूचित जमाती – अकोले
अनुसूचित जमाती महिला – कोपरगाव
सर्वसाधारण – श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी