मिळालेल्या माहितीनुसार, महापे एमआयडीसीमधील W-177 क्रमांकाच्या बिटाकेम या केमिकल कंपनीत ही आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक साठा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू
सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. केमिकल कंपनी असल्याने आग विझवताना विशेष खबरदारी घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या किमान ४ ते ५ गाड्या घटनास्थळी कार्यरत असून, पाण्याचा मारा सुरू आहे. सुदैवाने, या भीषण घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
advertisement
कारण अद्याप अस्पष्ट
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर आणि पंचनामा केल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील लोकांना बाहेर काढलं जात आहे. आजूबाजूच्या कंपन्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
