राज्यातील २२ जिल्हा परिषद आणि संबंधित जिल्ह्यांमधील पंचायत समितीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडली गेली होती. त्यामुळे तेथील निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. आताही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर २२ जिल्हा परिषदांच्या आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.
आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय?
अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निघत नाही तोपर्यंत निवडणुका घेणे उचित नसल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. त्यामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे.
advertisement
कोणकोणत्या जिल्ह्यांत आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांच्या वर?
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. प्रामुख्याने नंदुरबार, ठाणे, पालघर, गडचिरोली, धुळे, नाशिक, अमरावती, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांत ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देण्यात आले.
कोणकोणत्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका झाल्या?
जानेवारी महिन्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक झाली. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली गेली नव्हती, अशा ठिकाणी निवडणुका संपन्न झाल्या.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर या जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संपन्न झाल्या.
