मुंबई: राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड घडली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडले आहे. या पदाची जबाबदारी आता इंद्रनील नाईक यांच्या हाती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी येथे झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत या बदलाची अधिकृत घोषणा केली. या निर्णयानंतर विदर्भातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात खासदार प्रफुल पटेल यांनी पालकमंत्र्यांवर तीव्र टीका केली होती. “गोंदियाचे पालकमंत्री केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच जिल्ह्यात येतात, बाकी वेळ ते दिसतच नाहीत,” असे विधान पटेल यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतरच या बदलाला वेग आला असल्याची चर्चा आहे.
प्रकृती अस्वास्थामुळे राजीनामा?
बाबासाहेब पाटील यांनी प्रकृतीचे कारण देत पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते आणि सातत्याने पायाच्या त्रासामुळे लांबचा प्रवास करणं त्यांच्यासाठी अवघड होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
इंद्रनील नाईकांकडे गोंदियाची जबाबदारी...
राज्यमंत्री इंद्रनील नाईक आता गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार आहेत. नाईक हे स्वत: विदर्भातील असल्याने गोंदियाचे पालकमंत्री म्हणून अधिक चांगला न्याय देतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. भंडारा-गोंदियामध्ये प्रफुल पटेल यांचे चांगलेच वजन आहे. राष्ट्रवादीचा पालकमंत्री फक्त झेंडावंदनासाठी येत असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या. त्यानंतर आता बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पदासाठी आपल्या गृह जिल्ह्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना नकार देण्यात आला. बाबासाहेब पाटील आणि राष्ट्रवादीचे अन्य मंत्री हसन मुश्रीफ यांना स्वत: चा जिल्हा न मिळाल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.