आज पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होणार
दक्षिण राजस्थान परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर पासून, कमी दाबाचे केंद्र, गुना, दामोह, पेंद्रा रोड, संबलपूर, गोपालपूर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
advertisement
कोकण किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रापासून राजस्थानातील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.