गोंदिया : विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेला भाजपला किती जागा येतील याची आकडेवारीच एका सर्व्हेच्या आधारे ट्वीट केली. आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा मविआला किती जागा मिळतील, याची आकडेवारीच सांगून टाकली आहे.
advertisement
आज गोंदियामध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रेची भव्य सभा पार पडली. यावेळी बोलत असताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली.
रोहित पवार यांनी ट्वीट केलं असून येणाऱ्या विधानसभा निवडणूक सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला 155 जागा मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'या जागा वाढून 175 पर्यंत आम्हाला जागा मिळतील' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'अजित पवार स्वतःच्या इच्छेनं बोलत नाही'
अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक केली, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, 'अजित पवार हे काय बोलतात त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने ते बोलत नाही. त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात' असा खोचक टोला त्यांनी अजितदादांना लगावला.
' पोलिसांच्या तपासानंतर बोलणार'
नागपूरमध्ये ऑडी हिट अँड रन प्रकरणांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अपघात केला याविषयी बोलण्यासाठी महायुतीचे नेते टाळाटाळ करीत आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'आता याबाबतीत खराखुरा तपास पोलिसांनी करावा सर्व सीसीटीव्ही तपासावे आणि त्यानंतरच आम्ही योग्य वेळी बोलू, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
अजित पवार हे बारामती मधूनच निवडणूक लढतील
अजित पवार यांनी म्हटलं होतं की, ते बारामतीमधून विधानसभेचे निवडणूक लढणार नाही. पण कुणी त्यांना आग्रह केला तर अजित पवार हे बारामतीतूनच निवडणूक लढतील, असंही जयंत पाटील म्हणाले.
