नेमकी घटना काय?
मालाड येथील रहिवासी असलेले आलोक सिंह (३१) हे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवारी संध्याकाळी ते बोरिवली लोकलमधून प्रवास करत होते. मालाड स्थानकात उतरताना आरोपी ओंकार शिंदे आणि त्यांच्यात किरकोळ धक्का लागल्यावरून वादावादी सुरू झाली. ओंकार हा आलोक यांना पुढे सरकण्यासाठी सारखा ढकलत होता. पुढे एक महिला प्रवासी उभी असल्याने आलोक सिंह यांनी "धक्का मारू नको" असे म्हणत विरोध केला. मात्र, रागाच्या भरात असलेल्या ओंकारने खिशातून एक वस्तू काढली आणि थेट आलोक सिंह यांच्या पोटात खुपसली.
advertisement
चाकू नाही, तर चिमट्याने केली हत्या
सुरुवातीला ही हत्या चाकूने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, बोरिवली रेल्वे पोलीस मुख्यालयात आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने वेगळीच माहिती दिली. ओंकार शिंदे हा दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरातील एका मेटल कारखान्यात काम करतो. त्याच्याकडे हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी टोकदार चिमटा होता. भांडण विकोपाला गेल्यावर त्याने याच चिमट्याने आलोक यांच्यावर वार केला. चिमटा अत्यंत टोकदार असल्याने तो पोटात खोलवर घुसला आणि पोटातून भळाभळा रक्त येऊ लागलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने आलोक सिंह यांचा जागीच मृत्यू झाला.
सीसीटीव्ही आणि १२ तासांचे थरारनाट्य
हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपीने फक्त एकच वार केला आणि तो गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. रेल्वे पोलिसांनी तातडीने पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला. अखेर १२ तासांच्या आत मालाड स्थानक परिसरातूनच त्याला ताब्यात घेण्यात आले. ओंकारने गुन्ह्यात वापरलेला चिमटा फेकून दिला असून, पोलीस सध्या तो शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
