आरोपी ओंकार शिंदे असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तर अलोक सिंग असं हत्या झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. घटनेच्या दिवशी शनिवारी सायंकाळी आरोपी ओंकार आणि अलोक सिंग हे एकाच लोकलमधून प्रवास करत होते. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. उभा राहणंही मुश्कील होतं. अशा स्थितीत आरोपी ओंकार हा अलोक यांना सातत्याने पुढे सरकण्यास सांगत होता. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक घडली. धावत्या लोकलमध्ये हा वाद वाढत गेला. दरम्यान, मालाड रेल्वे स्थानक येताच दोघांमधील वाद विकोपाला गेला.
advertisement
यावेळी रागाच्या भरात ओंकारने अलोक यांना धारदार शस्त्राने भोसकलं. हा हल्ला इतका भयंकर होता की अलोक सिंग जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी अकोल सिंग यांना मृत घोषित केलं. यानंतर आज सकाळी पोलिसांनी आरोपी ओंकार शिंदेला अटक केली आहे. त्याला सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. यात आरोपी ओंकार हत्या केल्यानंतर पळून जाताना दिसत आहे. तो घाबरलेल्या अवस्थेत पळत आहे. त्या पाठीवर बॅग आहे. एवढ्या मोठ्या गर्दीत त्याने एका शिक्षकाची हत्या केली, तरीही त्याला कुणी रोखण्याचा प्रयत्न केला नाही. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याच फुटेजवरून पोलिसांनी आरोपी ओंकारचा माग काढला आणि १२ तासांच्या आत त्याला बेड्या ठोकल्या.
