मनोज जरांगे पाटलांनी आता अभ्यासकांवर पुन्हा बोली भाषेत तोफ डागलीय. सरकारच्या जीआरमधून मराठा समाजाच्या हाती काहीही लागलेलं नाही, असा आक्षेप आरक्षण अभ्यासकांनी घेतलाय. 'मराठवाड्यातील मराठ्यांच्या कुणबी नोंदीच सापडलेल्या नाहीत, त्यामुळे आरक्षण मिळणार तरी कसं?' असा प्रश्न अभ्यासकांनी उपस्थित केला होता.
मंगळवारी आझाद मैदानात जीआर काढण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी तो अभ्यासांकडे दिला होता. त्यावेळी अॅडव्होकेट योगेश केदार यांनी, सरकारच्या जीआरमध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत काही सूचना केल्या होत्या. मात्र त्या सूचनांची जरांगे पाटलांनी दखल घेतली नव्हती. केदार यांच्याप्रमाणेच असीम सरोदे, राजेंद्र कोंढरे आणि विनोद पाटील यांनीही याच मुद्याकडे लक्ष वेधलं होतं. त्यामुळे आरक्षण अभ्यासकांवर जरांगे पाटलांनी तोफ डागली. चाभरे अभ्यासक आधी कुठं गेले होते? शासन निर्णय निघाल्याचा त्यांना अजिबात आनंद झाला नाही, अशी टीका जरांगे पाटील यांनी केलीये.
advertisement
जरांगे पाटलांनी अभ्यासकांना चाभरे संबोधल्यामुळे आणि संभ्रम निर्माण केल्याचा आरोप केल्यामुळे अभ्यासकांनीही जशास तसं उत्तर दिलं. आरक्षणा संदर्भात केलेल्या सूचना या वैयक्तिक नव्हत्या तर त्या समाजाच्या हितासाठी होत्या, याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधलं. आम्ही प्रसिद्धीसाठी मत व्यक्त करत नाही, मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबीत टाकलेलेच नाही, असे मराठा नेते विनोद पाटील म्हणाले तर कुणबी प्रमाणपत्र किंवा ESW हेच दोन पर्याय असल्याकडे राजेंद्र कोंढरे यांनी लक्ष वेधले.
अभ्यासकांनी तिखट भाषेत प्रतिक्रिया दिल्यानंतर तरी जरांगे पाटलांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलीय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटलांनी मराठवाड्याच्या बोलीभाषेतील 'ह्यायचं' हा शब्द वापरल्यानं भाजपचे सर्व नेते आणि प्रवक्ते त्यांच्यावर तुटून पडले होते. आता अभ्यासकांवर टीका करताना बोलीभाषेतील 'चाभरे' या शब्दाचा वापर करून जरांगे पाटलांनी पुन्हा रोष ओढवून घेतलाय. मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटलांचं मोठं योगदान असल्यामुळे राज्यातील सर्वच लोक त्यांना आदर देतात, त्यांचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकतात. त्यामुळ जरांगे पाटलांवरील जबाबदारीही वाढलीय. परिणामी जरांगे पाटलांनी शब्दांचा जपून वापर करण्याची गरज आहे.