जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये आज मुंबई आंदोलनाच्या तयारी निमित्ताने मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची रुपरेषा जाहीर केली. जरांगे यांनी म्हटले की, तुम्हा सगळ्यांना मानावं लागेल. आपल्याला सतत नावं ठेवली गेली, फूट पाडण्याचे प्रयत्न केले. पण, तुम्ही कोणी फुटला नाहीत. आता आपल्याला रणभूमीत लढायचे असून विजयही मिळवायचा आहे. रणभूमीची अशी तयारी करा की विजय आपल्याला मिळवायचा आहे. आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, असे जरांगे यांनी म्हटले.
advertisement
जरांगे यांनी पुढे म्हटले की, मैदान आपल्याला गाजवायचे असून गुलाल पण आपल्याच अंगावर घ्यायचा आहे. दोन वर्षांपासून मराठा आंदोलनासाठी लढत आहे. ही अंतिम लढाई मराठ्यांनी पार करायची असल्याचे आवाहन त्यांनी केले.
आता नाद करायचा नाही...
मनोज जरांगे यांनी म्हटले की, आता विषय हक्काचा आहे. 58 लाख नोंदी आणि 4 कोटी मराठे आरक्षणात गेले आहेत. गावागावातून तयारी करा, 29 ऑगस्टला मुंबईला जायचे असून 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघायचे असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाचे दिवस असून मला तुम्ही मुंबईत सोडायला या, पुढचं मी पाहतो, असेही त्यांनी म्हटले. आता अशी संधी पुन्हा मिळणार नसून विजयाची चाहूल लागली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
फडणवीसांचे आम्ही शत्रू नाही, पण...
मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन वर्षांचा वेळ दिला. पण, आता आमच्यातील संयम संपला आहे. आता ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. आता वाशी बिशी नाही, सरळ मुंबईत जायचे असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईत शांततेत आंदोलन होणार असून फडणवीसांचे आम्ही शत्रू नाही. पण, एकाही मराठ्याला काठी लागली तर मुंबईतील रस्ते सुद्धा मोकळे राहणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
>> मनोज जरांगे यांनी कोणत्या मागण्या केल्या?
- मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढा
- हैद्राबाद गॅझेट लागू करा
- सातारा बॉम्बे गॅझेटही लागू करा
- आरक्षणासाठी सगे सोयरे तत्वाची अंमलजवणी करा
- मराठा आरक्षण आंदोलकांवरील सगळ्या केसेस मागे घ्या
- मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या
- शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्या, नोंदी शोधण्याचे काम सुरू करा
