बीड, 28 ऑक्टोबर : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली आहे. बीडच्या मादळमोही गावात ही घटना घडली आहे. बदामराव पंडित देवीच्या यात्रेनिमित्त गावात आले होते, तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. दुसरीकडे सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा मिरजेतील वंटमोरे कॉर्नर इथं अडवण्यात आला. खाडे यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ताफा अडवत काळे झेंडे दाखवले. मंत्री सुरेश खाडे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करावेत, अन्यथा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांनी दिला.
advertisement
'मला त्रास होतोय, पोटात पाणी नाही पण..'; जरांगे पाटील भावुक
लातूरमध्ये रविकांत तुपकर यांना मराठा समाजाने घेराव घातला. गाव बंदी असताना तुम्ही इथे का आलात? असा सवाल आंदोलकांनी तुपकरांना विचारला. लातूरमध्ये बैठकीचा आयोजन करताय तुम्ही मराठ्यांच्या विरोधात आहात का? असं म्हणत मराठा समाजातील काही तरुणांनी घोषणाबाजी करत रविकांत तुपकर यांना घेराव घातला.
संपूर्ण राज्यभरातून मनोज जरांगेंना पाठिंबा दिला जात आहे. राज्यभरात विविध आंदोलनं करत मराठा बांधव जरांगेंना पाठिंबा देत आहेत. अंतरवाली सराटीत एक मराठा बांधवाने जरांगेंना लोटांगण घालत पाठिंबा दर्शवला आहे. 50 किलोमीटर लोटांगण घालत अंतरवाली सराटीत दाखल होऊन त्यांनी जरांगेंना साथ दिली आहे.
जरांगे उपोषणावर ठाम
आरक्षणसाठी मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असून सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू करा असं आवाहन त्यांनी मराठा संघटनांना केलंय. उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू करत असून जर काही झालं तर सरकारची जबाबदारी असेल, त्यामुळे सरकारने हे आंदोलन गांभिर्याने घ्यावं असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मुंबईत एकत्र यावं आणि एक दिवसाचं अधिवेशन बोलवावं अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे.
